(Bimbabramha Ani Vastubramha)
लेखक : डॉ. गो. बं. देगलूरकर
प्रकाशन : स्नेहल प्रकाशन
डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी भारतात गुप्तकाळापासून प्रचलित असलेल्या शुष्कसंधी बांधणीच्या (dry masonry) देवळांचा आढावा घेऊन त्याचे मूळ बृहदश्मयुगीन चूल-तवा (dolmen) ह्या वास्तुप्रकारापर्यंत ते कसे पोहोचते हे दाखवून देतात; आणि शुष्कसंधी बांधणीचे तंत्र आणि त्या पद्धतीतील पाषाणात बांधलेल्या मंदिराचा उगम वायव्य सरहद्द प्रांतात होतो; तशी मंदिरे बांधण्याची स्फूर्ती तेथील ग्रीक आणि रोमन स्थपतींकडून मिळाली हा काही युरोपीय (उदा. सर अलेक्झेंडर कनिंगहॅम) विद्वानांचा सिद्धांत बाजूला सारतात. दक्खनमधील विशेषतः ऐहोळे, बदामी व पट्टदकल येथील देवळांची समर्पक उदाहरणे देत, धार्मिक नित्यचर्या आणि पूजाविधीसाठी भासणाऱ्या गरजांनुसार मंदिराचा आकृतीबंध सहाव्या शतकापासून क्रमाने बदलत अकराव्या शतकातील नागर मंदिरात अथवा दक्षिणेतील विमानसहित मंदिरात कसा विकसित झाला, हे ते दिग्दर्शित करतात. त्यानंतर अग्निपुराण, स्कंदोपनिषद, महान्तत्त्वचिंत्तक श्रीज्ञानेश्वर यांच्या विवेचनाचे दाखले देत विश्वरूपी देवळात निराकार अंतर्यामी परमात्मा हा ज्याप्रमाणे साकार देहात चेतन पण निराकार जीवतत्त्व वास करते त्याप्रमाणे राहतो हा त्यांच्या वास्तुब्रह्म संकल्पनेतील कळीचा मुद्दा सप्रमाण विस्ताराने मांडतात.
देवालय हे भक्तासाठी मोठे मोक्षसाधन आहे, हा पक्ष मांडताना 'देवाचीये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या' हे महत्त्वाचे आहे. ते त्या संतोक्तीचे सूत्र लक्षात घेऊन, देवदर्शनासाठी आलेल्या भक्ताला प्रवेश केल्यानंतर प्रदक्षिणा पूर्ण करून सभा मंडप, अंतराल पार करून गर्भगृहात गेल्यावर त्याला जीवा शिवाचे ऐक्य म्हणजे चौथी मुक्ती (सायुज्य) कशी मिळते याचे ते सखोल विवेचन करतात. प्रवेशद्वारापासून अंतराळात जाईपर्यंत पहिल्या तीन मुक्ती तेथील शिल्प दर्शनाच्या माध्यमातून कशा प्राप्त होतात हेही सांगावयास ते विसरत नाहीत. डॉ. देगलूरकर हे निदान गेले अर्ध शतक मंदिर स्थापत्याचा आणि मूर्ति-विज्ञानाचा अभ्यास करीत आहेत; आणि हे विषय ते विश्वविद्यालयातून शिकवित आहेत. त्यांचा हा प्रचंड व्यासंग लक्षात घेऊन अनेक संस्थांनी आपल्या पुरस्कारांनी त्यांना भूषित आणि सन्मानित केले आहे. उत्साही आबालवृद्ध अभ्यासकांनी देऊळ कसे पाहावे हे पूर्वीइतक्याच उत्साहाने न थकता ते समजावित असतात. सोप्या भाषेत व रसाळपणे विषय कसा समजवून सांगावा ह्याचा, त्यांचे बोलणे, व्याख्यान व लेखन म्हणजे एक आदर्श वास्तुपाठच असतो. बिंबब्रह्म व वास्तुब्रह्म या पुस्तिकाच्या माध्यमातून मूर्तिविज्ञान आणि देवालय वास्तुकला यावरील त्यांचे मूलस्पर्शी विचार अगदी सामान्य वाचकापर्यंत पोहोचतील व त्यातून वाचक वर्गाला निश्चितच लाभ होईल याविषयी यत्किंचितही शंका वाटत नाही.
प्रस्तावनेतून - डॉ. अ. प्र. जामखेडकर
(out of stock)
MRP ₹200 ₹170 (30₹ Discount)