अक्षरओळख झाल्यावर मी साने गुरुजींची 'श्यामची आई' वाचली आणि मग माझ्या 'माय'मध्ये 'श्यामची आई' शोधायला लागलो; पण मला ती कधीच सापडली नाही. पुढे पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, य. गो. जोशी, पु. भा. भावे यांचे साहित्य वाचले. मुल्कराज आनंद यांची 'द अनटचेबल' वाचली. मात्र आमचे जीवन, आमचा समाज, आमची संस्कृती, आमच्या आशाआकांक्षा यांचे उचित आणि यथातथ्य प्रतिविंव यांत कुठेच जाणवले नाही.
समता, स्वातंत्र्य, बंधुता, स्वार्थत्याग, न्याय, स्वसामर्थ्य, स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्वाध्याय यांचा वस्तुपाठ आमच्या लोकांनी, आमच्या वस्तीने आम्हाला 'दुधातूनच' पाजला. माझ्या लिखाणात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे लोक, ही वस्ती आहे. माझ्या लिखाणाचा संबंध हा असा थेट माझ्या जीवनाशी, अवतीभवतीच्या परिसराशी, माझ्या माणसांशी, माझ्या मातीशी, माझ्या आंबेडकरी विचारप्रणालीशी !
मी माझ्या कथांमधून समाजाच्या विविध स्तरांतील व्यक्तींच्या, जातींच्या प्रश्नांना, भावभावनांना, आशाआकांक्षांना चितारण्याचा प्रयत्न करतो. या कथांना प्रामुख्यानं 'समूह-कथा' म्हणता येईल. लिहिताना मी माझ्या 'माय'ची, माझ्या समाजाची विशिष्ट बोलीभाषा, शब्द, वाक्प्रचार, म्हणी वापरण्याचा प्रयत्न करतो. फुले-आंबेडकरी विचाराआचाराला अभिप्रेत नवीन प्रतीक, नवीन प्रतिमा, नवीन संकेत, नवीन मिथ्स निर्माण करण्याचा, रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. ब्राह्मणी संस्कृतीतील मिथ्स, आदर्श 'आमचे आदर्श' होऊच शकत नाहीत. त्यामुळे अ-ब्राह्मणी संस्कृतीतील मिथ्स व आदर्श शोधण्याचा व रुजविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो.