(Dnyandev Gatha)
लेखक : -
प्रकाशन : साहित्य अकादमी
ज्ञानदेव (इ.स.१२७५-इ.स. १२९६) हे वारकरी संप्रदायाला अधिष्ठानभूत विशिष्ट तत्त्वज्ञान देणारे योगी, तत्त्वज्ञानी व संतकवी होत. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व अभंगरचना अशी वाङ्मयनिर्मिती केली. तत्त्वज्ञान व काव्य यांचा समसमा संगम असणाऱ्या वाङ्मयाने लोकछंदात्मक ओवी आणि तालगेय अभंग यांना तत्त्वज्ञानाचे काव्यमाध्यम बनवून उंचीवर नेले. मराठी भाषेच्या बाल्यावस्थेतच अशा श्रेष्ठ वाङ्मयकृती निर्माण करून तिला प्रचंड अभिव्यक्तिक्षम बनवले. ज्ञानदेव, नामदेव आणि इतर सर्व संतांनी आपल्या वाङ्मयनिर्मितीद्वारा मराठी भाषेला तत्कालीच अभिजात बनवून टाकले होते. ज्ञानदेवांची परंपरा नाथपंथांची. गहिनीनाथांच्या उपदेशानुसार निवृत्तीनाथांच्याद्वारा त्यांनी योगमुद्रा आणि प्रेममुद्रा यांचा संयोग करून भक्तिमार्गाचे प्रशस्तपणे प्रवर्तन केले. आपल्या अद्वैत तत्त्वज्ञानाची काश्मिरी शैवाद्वैताच्या आधारे मांडणी करून जीव, जगत् आणि ईश्वर यांचे सौंदर्यपूर्ण दर्शन घडविले. ज्ञानदेवांच्या एकंदर वाङ्मयाचे हेच अंतःसूत्र आहे. त्या अंतः सूत्राचे दर्शन घडवणाऱ्या निवडक पाचशे अभंगांचे दिलीप धोंडगे यांनी साहित्य अकादेमीसाठी संपादन करून विवेचक प्रस्तावनाही लिहिली आहे. एकूण बावीस विषयांवरील विविध अभंग या संपादनात एकत्रित करताना ज्ञानदेवांच्या विषयांचे वैविध्य एकाच अनुभवाचे कसे अविष्कारण करते हे लक्षात यावे हा दृष्टिकोन ठेवला आहे. ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाच्या तुलनेत अभंगांच्या दुर्लक्षित अभ्यासाची पार्श्वभूमी तयार करणारे हे संपादन उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.
दिलीप धोंडगे (१९५६) हे कवी, ललित व वैचारिक गद्यलेखक, समीक्षक, शैलीमीमांसक इत्यादी नात्यांनी ज्ञात आहेत. सद्या ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे कुसुमाग्रज अध्यासनाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
(out of stock)
MRP ₹300 ₹240 (60₹ Discount)