
(Dola Sapan Lihun)
लेखक : सचिन माळी
प्रकाशन : शब्द
सचिन माळी यांची ही गीते चळवळीची गीते आहेत. लोकमनाला आवाहन करणारी गीते आहेत. रस्त्यात, चौकात, सभेत सादर करायची गीते आहेत. त्यामुळे शाहिराला मोठा जनसमुदाय अभिप्रेत असणारच, यात विशेष नवल नाही. हा समूह अजिबात अमूर्त नाही. तो इतिहासक्रमात सहभागी झालेला खराखुरा समूह आहे. हा जनसमुदाय म्हणजे केवळ जमाव नाही. हा जनसमुदाय ज्यांनी शोषण सहन केले आहे, जे अस्वस्थ आहेत, असंतुष्ट आहेत, जात, वर्ग, लिंगभाव यांचे भेदजनक अनुभव ज्यांनी घेतले आहेत अशा लोकांचा हा समूह आहे. शाहीर या समूहाचाच एक भाग आहे. त्याचा पुढला प्रवास या समूहाबरोबरच व्हायचा आहे याची जाणीव त्याला आहे. तो फक्त दोन पावले पुढे जाऊन समूहमनात दडलेल्या भावनांना जाणतो आहे. या भावनांची समूहाला जाणीव करून देतो आहे. या समूहाचा सुस्पष्ट उल्लेख अनेक गीतांमध्ये सुस्पष्टपणे येतो आहे. गावकुसाच्या बाहेर जेव्हा सूर्य कोंडला होता तेव्हा जातीचे जाळे विणून त्यात कोंडलेला थवा म्हणजे हा समूह आहे. माणसाच्या जन्माला येऊनही माणूस म्हणून ओळख निर्माण होण्याऐवजी धर्माच्या आणि जातीच्या अस्मिता ज्यांच्या वाट्याला आल्या आहेत अशा लोकांचा हा समूह आहे. ज्यांच्या पोटात भुकेचा तंटा लागला आहे असा हा समूह आहे. अशा या समूहाची बाजू घेऊन शाहीर भांडतो आहे. ज्यांच्याशी त्याचे भांडण आहे तेही अनेकदा श्रोतृवर्ग म्हणून या कवनांपुढे हजर होतात. शाहीर त्यांनाही कधी आवाहन करतो तर कधी आव्हान देतो.
- हरिश्चंद्र थोरात (प्रस्तावनेतून)
MRP ₹250 ₹225 (10% Discount)