चेहराविहीन माणसांचा आवाज बनणारी कविता संतोष पद्माकर पवार सतत लिहीत आले आहेत. सामान्यांच्या नाडवणुकीवर बोट ठेवत व्यवस्थेतील ढोंगावर आपल्या तिरकस शैलीने घणाघाती प्रहार करणारी कविता या कवीची प्रधान ओळख आहे. याच ओळखीला जागत सांस्कृतिक क्षेत्रातील अधोविश्वाला, वरचढ ठरणाऱ्या कृतकतेला आणि एकूणच आजच्या सांस्कृतिक भुरटेपणाला नीडरपणे अधोरेखित करते. अलीकडे कविता आणि तिचे समकालीन दर्शन हाही कवितेचा प्रतिपाद्य विषय झालेला आहे. कविता, कविताकारण आणि कविता विश्वातंर्गत असलेल्या सांस्कृतिक राजकारणाने मंडित या कविताशयाला समकालीन कवितेत तितकेच महत्त्वाचे स्थान आहे. नरेंद्र पंडितांच्या 'आमुचिया कविकुळा बोलू लागेल' इथपासून 'माझी पाठ करा कवी उट लावी दारोदार' लिहिणाऱ्या संत तुकाराम किंवा 'गवताऐंशी उदंड कविता' म्हणणाऱ्या रामदासांपर्यंत कवितांतर्गत विषयातील कवीची काव्यबांधिलकी आणि उपहास हा या कवितेचा गाभा राहिला आहे. नव्वदोत्तरी कवितेतून हा विषय अनेकांनी हाताळला असला तरी तिला साठोत्तरी आशयाचा आधार होता; याचा पुरावा 'कविता मला भेटली' या शीर्षक कवितेत सापडतो. अगोदरच्या पिढीशी कृतज्ञता बाळगताना तिच्यातील कथित सन्माननीय म्हणवल्या जाणाऱ्या, प्रसिद्धीच्या ऑक्सिजनवर पोसलेल्या आणि विसंगतीने भरलेल्या आजच्या कविता जीवनावर ती अधिक भेदक भाष्य करताना दिसते. संतोष पद्माकर पवार यांची ओळख 'कविता मला भेटली' या शैली विडंबनातून मराठी विश्वाला झाली. त्या आशयबिंदूच्या आसपास लिहून झालेल्या या त्यांच्या कवितेत कवितेशी उत्कट जोडलेली नाळ दिसून येते. मनस्विता हे काव्यमूल्य होऊ शकते का? याचे उत्तर या संग्रहात आपणास मिळू शकेल.