
(Sakhi)
लेखक : भारत पाटणकर
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
भारत पाटणकर या पुरोगामी विचारांच्या चळवळींशी जोडलेल्या कार्यकर्त्याच्या आत एक संवेदनशील कवीही दडलेला आहे, हे या कवितासंग्रहामधून पहिल्यांदाच आपल्यासमोर येत आहे. या कार्यकर्त्या कवीच्या आयुष्यात आलेल्या सखीला उद्देशून लिहिलेल्या या कवितांचे स्वरूप काहीसे आत्मनिवेदनात्मक आणि संवादी आहे. सातासमुद्रापलीकडच्या संस्कृतीत वाढलेली ही सखी आपली मातृभूमी सोडून, त्यांची सहचारिणी बनून कायमची भारतात येते; त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आपण आधीपासून अंगीकारलेल्या सामाजिक कार्यात सहजीवनाच्या भावनेतून क्रियाशील होते; कार्यकर्त्याचे खडतर जीवन स्वीकारून सावलीसारखी सोबत करते. तिच्याविषयीचा कृतज्ञभाव या कवितांतून अतिशय प्रांजळपणे व्यक्त झालेला दिसून येतो. पाटणकरांमधील कवी तिच्या या समर्पित व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू, विविध प्रसंगांतून दिसणारे तिच्या कणखर स्वभावाचे विशेष, तिचं जगण्याचं तत्त्वज्ञान आपल्यासमोर उलगडतो. मानवमुक्ती आणि नवनिर्माणाचा ध्यास घेतलेली आणि प्रेमाच्या साहाय्याने आपल्या सहजीवनाला अधिकाधिक मानुष पातळीवर आणू पाहाणारी ही सखी कवीच्या आयुष्यावर भक्कमपणे पसरून राहिली असल्याची जाणीव या कवितांमधून होते. एकूणच, या कवितांमधून भारत पाटणकरांनी चितारलेला आपल्यातील स्त्रीतत्त्वाला समृद्ध करणाऱ्या सखी-सहचारिणीसोबतच्या सहजीवनाचा काव्यात्म आलेख आपल्यालाही वैचारिक व भावनिक समृद्धी देणारा असाच आहे.
- प्रवीण दशरथ बांदेकर
MRP ₹100 ₹90 (10% Discount)