आज लिहिली जाणारी बरीचशी कविता ही या काळातील सामाजिक आणि राजकीय वास्तवाबद्दल तसेच आजूबाजूला पसरलेली हिंसा आणि विध्वंस यांविषयी बोलते आहे. पण सुनिता डागा यांना या अशा काळाबाहेर पडून चिरंतन दुःखाचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळेच त्या बोलतात ते 'मी-तू'च्या नात्याविषयी, त्यातील अपेक्षा, त्यातला भ्रमनिरास, वाढत चाललेला विसंवाद, त्यातून निर्माण झालेल्या दरीमुळे मिळालेली वेदना आणि ही दरी पार करून एकमेकांपर्यंत पोचण्याची असोशी याविषयी. प्रेम शोधण्याचा प्रयत्न त्या करतातच, पण या प्रेमात आणि 'तिच्या' - 'त्याच्या' संबंधात पडलेल्या अंतराविषयी अतिशय तरलपणे आणि काव्यात्मकतेनं व्यक्त होतात. त्या म्हणतात, 'अनेक हताश क्षणांच्या सह्या असलेल्या कराराचे दिवस होते ते...' अशा दिवसांतही 'आपण सोबतीनं वाचायला हवं एखादं तरी पुस्तक' असं सहज म्हणून जाणारी ही कवयित्री काळाच्या अबोल पोर्ट्रेटमध्ये अव्यक्त शब्दांचा संवाद चितारते. 'एखादी वेदनाच दिलासा देईल आता' असं वाटणाऱ्या या कवयित्रीला गहिऱ्या लाल, करड्या वाफाळ दुःखाचे रंग आणि त्याचे काळे करडे स्ट्रोक्स म्हणजेच कविता वाटते. या कवयित्रीला कविता ही गंभीरपणे लिहिण्याची गोष्ट आहे हे नेमकं कळलं आहे. त्यामुळेच पूर्वार्ध आणि उतरार्धाच्या मधोमध ठेवलेलं मोरपीस विसरण्याच्या या काळात ही कवयित्री आतली, आत्मशोधाची आणि आपला अंतःस्वर जपणारी कविता लिहिते आहे. काव्यात्मकता जपणाऱ्या आणि आपल्या 'स्व'ला स्वर देणाऱ्या या कवयित्रीला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या सदिच्छा ! - नीरजा