कादंबरी , अनुवादित

मधसूर्यछाया

(Madhasuryachhaya)

लेखक : रोन्या ओथमान

प्रकाशन : पपायरस प्रकाशन

असेच दिवसामागोमाग दिवस जात राहिले - आवारातल्या कोंबड्यांसारखे, निवांत, निष्काम. वेगळं असं काही घडतच नव्हतं आणि लैलापण विसरत चालली होती की, रेनजिन आण्टी व एविन आण्टी शहरातून नक्की कधी इथं भेटीला आल्या होत्या. पाच दिवसांपूर्वी की सहा? जितक्या हट्टानं काळाचं चक्र असं फिरत राहिलं, तितक्याच वेगानं लैलाला तिला गावात येऊन किती दिवस झाले याचा विसर पडू लागला आणि तितकीच ती जास्त जास्त अस्वस्थ होत राहिली. दुपारच्या जेवणाच्यावेळी किंवा नंतर बागेला पाणी देत असताना अचानक तिला वाटे की काहीतरी भयंकर घडणार आहे. तिला माहीत होऊन चुकलं होतं की असे विनाशकारी प्रसंग काही कधी पूर्व सूचना देऊन येत नाहीत. त्यांना यायचंच असेल, तर ते एकदमच येतात. जसं त्यावेळी, अनेक वर्षांपूर्वी, जेव्हा आजीचे वडील एका दुपारी एका झाडाच्या सावलीत जरा लवंडले होते व त्यांना झोप लागून गेली होती व काही माणसं अचानक आली होती व त्यांनी आजीच्या वडिलांना ठार मारलं होतं. आजी ज्याला 'फर्मान' म्हणायची ते कधीच सांगून यायचं नाही, हे लैलाला माहिती होतं. लैलाला वाटायचं की लवकरच जगबुडी येणार. एक धरणीकंप किंवा प्रलय. जसा त्या वेळी प्रलय आला होता - जीनं तिला शैखानच्या टेकडीची कथा सांगितली होती - जेव्हा आदिकाळात पृथ्वीवरील सर्व मनुष्यप्राण्यांमध्ये फक्त एक म्हातारी बाई आणि एक गायच स्वतःला वाचवू शकले होते. लैला विचारात पडली की, समजा प्रलय आला व तिच्यापाशी त्या टेकडीवरून उडून जाण्याकरता एक विमान असतं, आणि जर तिला फक्त एका मनुष्यप्राण्यालाच वाचवणं शक्य असतं - किंवा दोघांना, किंवा तिघांना, चारांना, दहांना, विषण्ण... कारण सगळ्यांना जिवंत राहणे तर शक्य नव्हतं, तर असा कोण मनुष्यप्राणी असावा की ज्याला ती आपल्या विमानात बसवून बरोबर घेऊन जाऊ शकली असती? कोणाची निवड करावी तिनं? आणि मग तिला तिच्याच विचारांची लाज वाटली. होती कोण ती? विधाति? तिच्या माणसांच्या जन्म-मृत्यूवर राज्य करणारी?

- कादंबरीमधून

(out of stock)

MRP ₹350 ₹260 (90₹ Discount)