कादंबरी

वॉर्ड नं.०७ सर्जिकल

(Ward No. 7 Surgical)

लेखक : भाऊ पाध्ये

प्रकाशन : शब्द

वॉर्ड नं. ७ सर्जिकलचा विषय माणसाचे शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य आणि त्यावरील शस्त्रक्रिया हा आहे. मानवी संबंधांतील ताणेबाणे या अस्वास्थ्याच्या मुळाशी दडलेले आहेत. विशेषतः मध्यमवर्गीय संस्कृतीतील दंभ आणि नातेसंबंधातील जाचकता हे एक ठळक आशयसूत्र या कादंबरीतून व्यक्त झाले आहे. आपल्या भोवतालच्या वास्तवाला भिडताना माणसाची सर्जनशीलता हे एक उपयोगी आयुध ठरू शकते आणि पळवाटही ! हॉस्पिटलच्या वॉर्ड नं ७ सर्जिकलमधील जगातील माणसाची हतबलता, मानवी मृत्यू आणि आयुष्याची निरर्थकता बाहेरच्या जगाचे सूचन करत राहते. नात्यांचा, तोंडदेखल्या औपचारिक सामाजिक संबंधांचा जहरी विषासारखा विळखा हा शारीरिक रोगापेक्षा अधिक जीवघेणा आजार आहे आणि संबंधांची चाकोरी मोडण्याची शस्त्रक्रिया माणसाला अधिक मुक्त करणारी आहे, असे जेव्हा सूचित होते तेव्हा हॉस्पिटलचा वॉर्ड नं. ७ सर्जिकल आणि तेथील जग हे रूपक अधिकाधिक अर्थपूर्ण ठरू लागते. ऐंशीचे दशक म्हणजे 'तपशिलांचे भरताड हेच वास्तवाचे दर्शन' असे मानल्या जाण्याच्या काळाची सुरुवात होती. त्या पार्श्वभूमीवर कथानकाच्या अंतःस्तरातून पांढरपेशी वर्गाच्या ढोंगाचा बुरखा फाडत आधुनिकवादी विश्वभान व्यक्त करणारी ही कादंबरी छोटा अवकाश असला तरी लक्षणीय ठरली होती. मानवी संबंधांना आणि मानवी अस्तित्वालाच वस्तुरूपता, यांत्रिकता देणाऱ्या, व्यक्तिविशिष्टता नष्ट करून सरसकटीकरण करणाऱ्या समकालात नायकाच्या सर्जनशील कृतींतून व्यक्तिविशिष्टतेचे सूत्र अधोरेखित करणारी ही कादंबरी निश्चितच प्रस्तुत ठरते.

- डॉ. नीलांबरी मंदार कुलकर्णी


MRP ₹150 ₹135 (10% Discount)