
(Aswastha Prajasattak)
लेखक : भालचंद्र मुणगेकर
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
देशातील वर्तमान घडामोडीचा व्यापक राजकीय-सैद्धांतिक आशय असा आहे ('क्रोनी') उद्योगपतींचे अर्थव्यवस्थेवरील वर्चस्व, सर्व प्रकारच्या निर्णयप्रक्रियेचे एका व्यक्तीच्या हातातील केंद्रीकरण, अशा व्यक्तीला 'देवत्व' बहाल करण्याची वाढती प्रवृत्ती व तिच्या धोरणाला विरोध म्हणजे 'देशद्रोह,' भूतकाळाचे उदात्तीकरण, पुनरुज्जीवनवाद, धार्मिक व वांशिक अल्पसंख्याकांना वेठीस धरून ध्रुवीकरण, बहुसंख्याकवाद, आधुनिकीकरण-वैज्ञानिक दृष्टिकोणाला विरोध, प्रबळ अंधश्रद्धा, हिंसेचे समर्थन, युद्धखोर मानसिकता निर्माण करण्याचे प्रयत्न, इतिहासाचे विकृतीकरण व आपल्या राजकीय उद्दिष्टांशी सुसंगत असे त्याचे पुनर्लेखन... अशी विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठी देशभर लहान-मोठ्या शेकडो कृतिशील संघटनांचे जाळे उभारणे, इत्यादी फॅसिझम / नव-फॅसिझमची प्रमुख लक्षणे सांगता येतील, ही सर्व लक्षणे एखाद्या देशात एकाच वेळी आढळून येतील, असे नाही. त्याचप्रमाणे, प्रत्येक देशात फॅसिझम /नव-फॅसिझम एकाच विशिष्ट पद्धतीने येईल, असेही नाही. त्याचे स्वरूप त्या त्या देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक भूतकाळ व वर्तमानकालीन परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेच इटली व जर्मनीमधील फॅसिझमचे स्वरूपसुद्धा एकसारखे नाही.
वरील सर्व गोष्टीचा आशय सावरकर हेडगेवार-गोळवलकरप्रणित 'हिंदुत्व' या विचारधारेवर आधारित 'हिंदू राष्ट्र' निर्माण करण्याच्या दृढ संकल्पांत आहे. 'हिंदू' हा धर्म आहे. ती उपासनापद्धती आहे, भारतातील २५ टक्के धार्मिक अल्पसंख्याक सोडून उरलेले सर्व 'हिंदू' ती जीवनपद्धती अनुसरतात, तो केवळ त्यांचा घटनात्मकच नव्हे, तर जन्मतः अधिकार आहे. भारताच्या व्यामिश्र संस्कृतीचा एक सर्वांत मोठा भाग प्राचीन हिंदू संस्कृतीने व्यापला आहे. याउलट, 'हिंदुत्व' ही फॅसिस्ट राजकीय विचारसरणी आहे. 'हिंदू राष्ट्र' या फॅसिस्ट विचारसरणीवर आधारित असून तो भारतातील नव-फॅसिझमचा आविष्कार आहे.
MRP ₹350 ₹295 (55₹ Discount)